आमची यशोगाथा
गावाची ओळख
ग्रामपंचायत हातेरी ही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक सुंदर, निसर्गरम्य आणि आदिवासी संस्कृती जपणारी ग्रामपंचायत आहे. डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेली हातेरी ग्रामपंचायत आपल्या रूढी, परंपरा आणि सामाजिक एकतेसाठी ओळखले जाते. गेल्या 20 वर्षांपासून माळघर, दापटी, बोरीचापाडा हि गावे १००% दारूबंदीमुक्त असून, लोकसहभागातून आदर्श ग्रामविकासाची दिशा मिळाली आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन महसूल गावे — हातेरी व माळघर आहेत. हातेरी महसूलात हातेरी, कोकणपाडा, रुईचापाडा, बोरीचापाडा, केळीचापाडा हे पाडे तर माळघर महसूलात माळघर, नवापाडा आणि दापटी हे पाडे आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या सुमारे १९९५ आहे. जाबकार्ड धारक संख्या – ६०४ आहे.
इतिहासाची झलक
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वसलेले हातेरी हे गाव केवळ एक स्थान नाही, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे एक ऐतिहासिक स्थळ आहे. या गावाला लाभलेला 'हातेरी' हा नाव, येथील स्थानिक वयोवृद्धांच्या मौखिक परंपरेतून आणि आख्यायिकांमधून उलगडतो, जो मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाशी जोडलेला आहे.
स्थानिक माहितीनुसार, हा इतिहास १६६४ आणि १६७० मधील सुरतेच्या धाडीशी जोडलेला आहे. सुरतेवरून प्रचंड संपत्ती आणि लूट घेऊन परतताना, महाराजांच्या सैन्याचा शत्रूंनी पाठलाग सुरू केला. आपल्या अमूल्य वस्तू आणि सैन्याचे रक्षण करण्यासाठी, महाराजांच्या सैन्याने जव्हार तालुक्यातील निसर्गरम्य आणि अभेद्य अशा हातेरीच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. या आश्रयाच्या वेळी, शत्रूंना आपली नेमकी शक्ती आणि ठिकाण कळू नये म्हणून, किंवा मोहिमेनंतरचा धोका संपल्यावर पुन्हा वापरता यावीत म्हणून, सैन्यातील अनेक शस्त्रे याच ठिकाणी, डोंगराच्या कपारीत किंवा गुप्त जागी, लपवून ठेवण्यात आली होती. या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेमुळेच या गावाला मूळतः “हत्यार”ब असे नाव पडले. कालांतराने, बोलीभाषेतील सोयीनुसार आणि उच्चारणानुसार, या ‘हत्यार’ शब्दाचे रूपांतर “हातेरी” असे झाले.
शिक्षण व सुविधा
गावात शिक्षण आणि आरोग्य यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत —
• जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : 4
• अंगणवाडी केंद्रे : 6
• व्यायामशाळा : 1
• सभामंडप : 5
तसेच गावात सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण योजना, सार्वजनिक विहिरी, शेततळी आणि धार्मिक स्थळे उपलब्ध आहेत, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन अधिक सक्षम झाले आहे.
शेती व उद्योग
हातेरीतील बहुतेक लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भात, नगली, तूर, उडीद आणि खुरसणी ही गावातील प्रमुख पिके आहेत. मागील काही वर्षांत NREGA आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गावात शेततळी बांधकाम, जलसंधारण आणि फळबाग लागवड (मोगरा, आंबा इत्यादी) यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) व्यवसाय सुरू करून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
शासकीय योजना व यश
ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत —
• PMAY व शबरी आवास योजना अंतर्गत अनेक कुटुंबांना घरकुल लाभ मिळाला आहे.
• स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हातेरी ग्रामपंचायतीला सन 2021 मध्ये “ODF Plus” दर्जा मिळाला आहे.
• जलसंधारण व पाणीपुरवठा योजना द्वारे हातेरी, कोकणपाडा, रुईचापाडा व दापटी येथे पाणीपुरवठा नियमित झाला आहे.
• तंटामुक्त गाव मोहिम (2010-11) मध्ये हातेरीला “तंटामुक्त गाव” पुरस्कार मिळाला आहे.
• स्वच्छता अभियान पुरस्कार जिल्हा व तालुका पातळीवर प्राप्त झाला आहे.
लोकसहभाग व ग्रामविकास
ग्रामपंचायतीचा विकास हा सरपंच, उपसरपंच, 8 सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे.
सर्व निर्णय लोकसहभागातून आणि पारदर्शकपणे घेतले जातात.
प्लास्टिकमुक्त व दारूबंदीमुक्त या संकल्पनांवर गावाने ठाम पाऊल टाकले आहे.
भौगोलिक स्थान
हातेरी हे गाव तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे वसलेले असून तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर आहे. गावाचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्रफळ २३८ हे.आर. असून ग्रामपंचायतीत ३ वार्ड आणि ७०३ कुटुंबे वास्तव्यास आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १९९५ आहे. गावाचा भौगोलिक विस्तार डोंगर, उतार आणि काही प्रमाणात सपाट प्रदेशात पसरलेला आहे. शेतीयोग्य जमीन मर्यादित असली तरी ती अत्यंत सुपीक आहे. हवामान उष्णकटिबंधीय असून उन्हाळ्यात तापमान साधारण ३९°से., हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. दरवर्षी सरासरी २३०० मिमी पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे येथे हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य नेहमीच खुलते.
लोकजीवन
हातेरी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान आणि परंपरागत आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून भात, नागली, वरी, तूर, उडीद, खुरसणी, कुळीथ अशी पिके घेतली जातात. याशिवाय आंबा व काजू यांसारखी हंगामी फळपिकेही घेतली जातात. काही ग्रामस्थ कुक्कुटपालन यांमध्येही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा खोलवर रुजलेल्या आहेत.
• बोरीचापाडा येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी २० ते २२ मे दरम्यान वारकरी संप्रदायाचे भजन-कीर्तन-प्रवचन मोठ्या उत्साहात साजरे होतात.